छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): जेवणात केस निघाला म्हणून पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. तू तिकडेच मरून जा, असे सुनावले. त्यामुळे प्रत्येक वेळी माहेरी जावून आई-वडिलांनाही त्रास नको म्हणून विवाहितेने दुसऱ्याच दिवशी ७ एप्रिलला दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी सासरच्या १७ लोकांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ७ आरोपींना अटक केली आहे.
ईश्वरी राजू भुजंग (ईश्वरी अजय बनकर), असे मृत विवाहितेचे नाव आहे. पती अजय अशोक बनकर (३०), चंद्रमणी दशरथ बनकर (५६), छाया चंद्रमणी बनकर (४६), आशीष चंद्रमणी बनकर (२७, सर्वरा. श्रावस्ती कॉलनी, पेठेनगर, भावसिंगपुरा), गणेश दिलीप बनकर
(३०), दिनेश दिलीप बनकर (३५, दोघे रा. साईनगर, पडेगाव), दिलीप दशरथ बनकर (५८, रा. देवळाणा, सुलतानपूर, ता. खुलताबाद), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांनी दिली. ईश्वरीचे वडील राजू भुजंग (५२, रा. वळदगाव) हे फिर्यादी आहेत. २०२० मध्ये ईश्वरीचे अजयसोबत थाटात लग्न लावून दिले होते. तेव्हा त्याला २ तोळ्याची साखळी, ५ ग्रॅमची अंगठी, मुलीला ५ तोळे सोने आणि २ लाख रुपये
हुंडा दिला होता. लग्नानंतर ३ वर्षे त्याने ईश्वरीला चांगले नांदविले. त्यानंतर मात्र, तो सतत दारू पिवून ईश्वरीला मारहाण करायचा. घर बांधायला माहेरहून पैसे आण म्हणून शिवीगाळ करायचा. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक काकासाहेब नागवे करीत आहेत, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांनी दिली.
ईश्वरीने आत्महत्या केल्याची माहिती ७ एप्रिलला संध्याकाळी तिच्या माहेरच्या नातेवाईकांना मिळाली. त्याच रात्री ते आक्रमक झाले. त्यांनी सासरच्या लोकांवर आरोप करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनीही १७जणांवर गुन्हा दाखल केला. ८ एप्रिलला ईश्वरीचा मृतदेह ताब्यात घेताना नातेवाईक पुन्हा आक्रमक झाले. घाटीत मोठा जमाव एकत्र आला होता.














